पाऊस बेपत्ता , विदर्भात दुबार पेरणीचे संकट, २ शेतकय्रांच्या आत्महत्या
शासनाने निसर्गसंकट घोषीत करून संकटग्रस्त शेतकय्रांना आर्थिक मदत द्यावी - किशोर तिवारी
आशिष बडवे
नागपुर - २१ जुन २००८ विदर्भातुनच नाही तर संपुर्ण राज्यातुन पाऊस बेपत्ता झाला असुन कापुस उत्पादकांची पंढरी असलेल्या विदर्भावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. कर्जाच्या ऒझ्याखाली दिवस काढणाय्रा शेतकय्रांनी वेध शाळेचा पावसाचा अंदाज लक्षात घेवुन कर्जाची उचल करून केलेली पेरणी पावसाअभावी वाया गेल्याने त्यांनी कर्जातुन मुक्तीसाठी पुन्हा आत्महत्येचा मार्ग नैराश्येपोटी स्विकारला असुन केळापुर विभागात दोन शेतकय्रांनी दुबारपेरणीच्या संकटामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दुबार पेरणीच्या संकटातुन शेतकरी आत्महत्येचे पेरणीच्या दिवसात सुरू झालेले सत्र थांबविण्यासाठी राज्य शासनाने निसर्गसंकट जाहीर करून संकटग्रस्त शेतकय्रांना तात्काळ आर्थिक मदत घोषीत करावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. विदर्भात यंदा लवकरच पावसाळ्याला सुरूवात होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. त्यानुसार यंदा केरळ मध्ये वेळे पुर्वीच मान्सुन दाखलही झाला. परंतु महाराष्ट्राकडे मान्सुन सरकत असतांना त्याचा जोर कमी होत गेला पुणे, मुंबई आणि कोकण वगळता विदर्भात कोठेही पेरणीयोग्य मोठा पाऊस कोसळला नाही. दरम्यान पावसाळी वातावरण पाहता पुणे येथील वेध शाळेने राज्यात भरपुर वृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार विदर्भात शेतकय्रांनी पेरण्या उरकल्या परंतु मृग नक्षत्र पुर्णपणे कोरडे गेल्याने विदर्भासह राज्यावर दुबार पेरणीचे संकट ऒढवले आहे. कर्ज काढुन पेरणी उरकल्याने व डोक्यावर असलेले शेत कर्ज आणि त्यात दुबार पेरणीचे संकट अशा परिस्थीतीत शेतकय्रांची मानसीक स्थिती बिघडू लागली आहे. या संकटाला सामोरे जाण्याची ताकद शेतकय्रांजवळ उरली नसल्याने शेतकय्रांनी कर्जमुक्तीसाठी आत्महत्येचा मार्ग अंगीकारला आहे त्यातुनच केळापुर विभागात दोन शेतकय्रांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली गारगोटी पोडावरील रामभाऊ भोमु आत्राम वय (३०) व गणीराम कुचा राठोड रा. वासरी ता. घाटंजी अशी त्यांची नावे आहेत. रामभाऊ भोमु आत्राम यांचे आज पांढरकवडा उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आहे. दुबार पेरणीच्या संकटामुळे आत्राम परिवार दुःखाच्या सागरात बुडाला आहे. या निसर्ग संकटातुन शेतकय्रांना वाचविण्यासाठी व संकटग्रस्त शेतकय्रांचे आत्महत्या सत्र नियंत्रीत करण्यासाठी शासनाने तात्काळ निसर्गसंकट जाहीर करून संकटग्रस्त शेतकय्रांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी कळकळीची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे ईमेल व्दारे निवेदन पाठविले आहे.